२३ ऑक्टोबर, २०१२

ज्ञानेश वाकुडकर : दोन गझला




१.

देवांनो!

या इकडे अन माझ्यासोबत जरा बसा रे देवांनो;
ही धर्माची लफडी सोडा..जरा हसा रे देवांनो!

मंदिर-मस्जिद करता करता माणूस पागल झाला;
हृदयी त्याच्या तुम्ही एकदा जरा धसा रे देवांनो!

कुणी ओढतो रेष मधे अन..देश वेगळा होतो;
त्या रेषेचे घाव मनातून जरा पुसा रे देवांनो!

इथला सैनिक, तिथला दुश्मन.. अर्थ बदलतो सारा;
रंगासोबत न्याय बदलतो.. असा कसा रे देवांनो?

'तो' येण्याची पुन्हा नव्याने बोंब कशाला मारू?
सांगून सांगून थकला माझा खुळा घसा रे देवांनो!

२.

अहवाल

हे हळूच किलकिलती झोपेचे दरवाजे;
हा श्वास म्हणावा की..आभास तुझे ताजे?

उजवे, डावे, मागे..सारेच बुरुज गेले...
किल्ल्यात फितुरीचा हुंकार कसा वाजे?

हे युद्ध कुणी जिंको..हे युद्ध कुणी हारो..
कानून तुझा चाले..आम्ही कसले राजे?

सारेच तुझे आहे..अहवाल पहा ताजा...
जोडून तुझ्यापुढती..बघ नाव दिसे माझे.

आभाळ उडाले का?वाराच तसा आला...
रेषेतून जगण्याचा..इतिहास कुठे गाजे?

झाले ते झाले ना..तू लोड नको घेवू...
मुर्खाला सांग जरा..का गाल तुझा लाजे?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: