२३ ऑक्टोबर, २०१२

मिलिंद हिवराळे : तीन गझला




१.

तळ

तळ मनाचा खोदतोय;
मीच मजला शोधतोय.

भोवती बहिरा जमाव;
मी किती झंकारतोय.

नाव त्याचे घेतलेस;
मज उखाणा हासतोय.

तू अता येऊ नकोस;
मी मला सांभाळतोय.

आज गझले घे मिठीत;
प्राण माझा भटकतोय!

२.

किती

किती जळू मी अंधार हा सरेना;
किती पळू मी संसार हा टळेना.

फुटून गेले निष्पाप आरसेही;
जगास माझे हासूच पाहवेना.

नभात त्या मी घेऊ कसा भरारी?
मिठीतला हा मज चंद्र सोडवेना.

तुझीच होती, आहे, असेल आशा;
नकोनकोसा मज तू नकार देना.

लिलाव केला माझ्याच आसवांचा;
दलाल सारे, माणूस आढळेना.

जगून घे तू हा दिवस आजचा रे;
मला उद्याचा धागाच सापडेना!

३.

कहाणी

दु:ख नाही घात केला मुखवट्यांनी;
ऐकली ना हाक माझी चेह-यांनी.

माणसाला राहण्याची सोय कोठे?
घाण केली जीवघेणी मंदिरांनी.

काय सांगू मी कहाणी जीवनाची?
तारले, सांभाळले मज वेदनांनी.

राजकारण कुरण झाले बारमाही;
लोकशाही फस्त केली गाढवांनी.

सूर्य अमुच्या एकतेचा उगवलेला;
चालते व्हावे जिहादी काजव्यांनी!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: