२३ ऑक्टोबर, २०१२

प्रशांत सदानंद वैद्य : दोन गझला




१.

असतो परिस्थितीच्या हाती लगाम येथे;
हा ही गुलाम येथे... तो ही गुलाम येथे.

सार्‍याच चेहर्‍यांची झालीत प्रश्नचिन्हे;
झाले खरेच आहे जगणे हराम येथे.

घ्या पक्ष कोणताही पाहून भोवतीचा;
थोडेच कार्यकर्ते...नेते तमाम येथे.

आहेत राजरस्ते माझे जरा निराळे;
लाचार ह्या सुखांचे काही न काम येथे.

आताच श्वास ठेवा पाण्यापरी भरूनी;
घेण्यास श्वाससुद्धा लागेल दाम येथे.

धर्मात दोष नसतो...वृत्तीत खोट असते;
दाउदही इथे अन अब्दुल कलाम येथे.

राधेपरीच आहे ह्या मैफलीत मीरा;
घेतात पाहुनी त्या माझ्यात श्याम येथे.

ठेवूनही भरोसा आयुष्य दूर जाते;
पाठी सदैव असतो मृत्यूच ठाम येथे.

झालीस तू यशोदा भिरकावल्या फुलांची;
करतात देव सारे तुजला सलाम येथे.

२.

व्हायचे होते अखेरी तेच झाले;
हातुनी माझ्या गुन्हे न्यारेच झाले.

घेत गेलो सावलीसाठी नभाला;
गारव्यांचेही गुलाबी पेच झाले.

बेत होता एकट्याने भेटण्याचा;
सोबती माझे जणू वारेच झाले.

केवढा मी लाघवी होतो कळेना;
भेटले जे जे मला - माझेच झाले.

चाल तू केलीस केंव्हा लोचनांची;
सारखे आभास स्व्प्नांचेच झाले.

एवढे झाले...तरीही ऐकतो की -
'लाड थोडेफार ओठांचेच झाले!'

बोलली नाहीस तू - ना बोललो मी;
शेवटी हे प्रेम अंदाजेच झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: